नरसिंहपुरी श्रीनृसिंहाच्या दोन प्रमुख मुर्ती आहेत, एक श्री नृसिंह आणि एक श्री शामराज. नरहरि हे नरसिंहाचे दुसरे नाव, यांतील हरि या शब्दा्चा अर्थ सिंह आहे. नरहरी शामराज असा संयुक्त शब्दाप्रयोग वारंवार उपयोगिला जातो. शामराज या शब्दातील शाम हा शब्द श्याम या अर्थाचा नाही. शम – शामयति या मूळ संस्कृत धातूपासून शाम हे रुप तयार झाले असून त्याचा अर्थ "महाभयंकर क्रोध तसेच रौद्र स्वरुप सौम्य झाले" असा आहे. ब्रम्हादेवादिक देव स्वपत्नी लक्ष्मी यांच्या विनवणीनेही ज्याचा क्रोध शांतला नाही तो भक्त प्रल्हादाच्या कणवेने शांतला व नरहरि शामराज झाले. नरहरि दुष्ट निर्दालक आहे. तर शामराज हा भक्त प्रतिपालक आहे.

प्रल्हादकृत श्रीनृसिंहमूर्ती

नरसिंहपुरी देवालयातील नृसिंहमूर्ती सिंहासनावर सांप्रत विराजमान आहे. ही मूर्ती पश्चिमाभिमुख आहे. ही वालुकेची मूर्ती वीरासनस्थ -उजवा पाय गुडध्यात मुडपून उभा, डाव्या पायाची मांडी घातलेली, सव्य हस्त उजव्या गुडघ्यावर, वाम हस्त कमरेवर आहे. रुंद छाती, बारीक कमर, मुख सिंहसदृश रुंद व उग्र, बसकट नाक, रुंद जिवनावळ, भव्य डोळे अशी उग्र चर्या आहे. मुख, छाती, कमर ही केवळ सिंहसदृश तर हातपाय मानवी वाटतात. या मूर्तीतून कोणते भाव प्रतीत होतात हे सांगण्या्स केवळ श्रुत्यादीच समर्थ आहेत.

सिंहो न भीमो मनसो जवीयान्

अभक्तां ना सिंह न । सिंह इव भीमः भीषणः

भक्तानां तु सिंहोsपि न भीमः न भीषणः

उग्रेाsप्यीनुग्र एवायं स्वीभकतंना नृकेसरी

केसरीव स्वपोतानामन्येषामुग्रविग्रहः


ब्रम्हादेवकृत श्री शामराज मूर्ती

आपल्या जन्माचे मुळ शोधण्यासाठी ब्रम्हदेवांनी तप केले. ते तप फळास येवून श्री विष्णूंनी ब्रम्हादेवांस दर्शन दिले. त्यांनी ब्रम्हा्देवांना गुहाज्ञान सांगुन त्यांचेवर अनुग्रह केला तो याच नीरानृसिंह क्षेत्री. ब्रम्हादेवांनी श्रीविष्णूंची स्तुती केली. तिने प्रसन्न होऊन श्रीविष्णू ‘वर ब्रूहि’म्हणताच ब्रम्हादेव म्हणाले, “लोककल्याणार्थ आपण महीतलावर निरंतर वास्तव्य करावे“ श्रीविष्णूंनी आश्वासिले. श्रीविष्णुंच्या या वास्तव्याला अधिष्ठाण हवेच होते. ते स्वतः ब्रम्हादेवांनी निर्माण केले. त्यांनी श्रीविष्णूंची नृसिंहस्वरुपी मूर्ती केली व त्या मूर्तीत नित्य वास्तव्य करण्याविषयी श्रीविष्णूंस प्रार्थिले. तथास्तु म्हुणुन श्री विष्णू अंतर्धान पावले. श्री शामराज नामे प्रसिध्द असलेली मूर्ती ब्रम्हादेवकृत असून ती प्रल्हादकृत मूर्तीच्या डाव्या बाजूस उत्ताराभिमुख अशी स्थापित आहे. ही मूर्ती पाषाणाची असून हिचे प्रल्हादकृत मूर्तीशी बरेच साम्य आहे. प्रल्हादकृत मुर्तीपेक्षा हिचा रेखीवपणा कमी असला तरी माहात्म्य कमी नाही.