श्री नृसिंहाचा अवतार झाला तो मुलस्थान या क्षेत्री, हे सध्या मुलतान या नावाने पाकिस्तानात प्रसिद्ध आहे. हिच हिरण्यकश्यपूची राजधानी होती आणि त्याचा वधही तेथेच झाला. दुष्ट दैत्याचा वध व प्रल्हादासारख्या सज्जनाचे रक्षण करावयाचे म्हणून तर भगवान महाविष्णूंनी श्री नृसिंह रुपे चतुर्थावतार घेतला. अर्थातच दशावतारांपैकी हाच एक चतुर्थावतार

पद्म पुराणात म्हटले आहे की, भगवान विष्णूंनी वराह हा तिसरा अवतार धारण करून हिरण्याक्षाचा वध केला, बंधूवधाने संतप्त होवून हिरण्यकश्यपूने अत्युग्र तपश्चर्या करून ब्रम्हदेवांकडून अनेक वर मिळवले, मग मात्र तो पिसाळला. उन्मत्त हिरण्यकश्यपूने देवांशी उघड उघड वैर मांडले. देवांचा राजा जो इंद्र तो देखिल हिरण्यकश्यपूच्या करणीने हबकला. हिरण्यकश्यपूचा निर्वंश करावा हा हेतू मनी धरून इंद्राने एक कृती केली. हिरण्यकश्यपू राजधानीत नाही हे पाहून इंद्राने राजधानीवर स्वारी केली व हिरण्यकश्यपूची गर्भवती सतीपत्नी कयाधू हिचे हरण केले, या कयाधूसह इंद्र स्वलोकी जात असतांनाच महर्षी नारदांनी इंद्राची भेट घेवून सांगितले, “देवेंद्रा, या सतीस यत्किंचीतही पीडा करू नकोस, हिच्या गर्भस्थ महान भगवतभक्त असून त्याच्या रक्षणार्थ श्री महाविष्णू अवतार घेतील. नारदांची ही आज्ञा प्रमाण मानून कयाधूस नारदांच्या आश्रमात ठेवून त्याने प्रयाण केले.

महर्षी नारदांचा आश्रम नरसिंहपुरीच भीमेच्या काठी कोटीतीर्थावर होता. सती कयाधू तिथेच प्रसूत झाली, महान भगवतभक्त प्रल्हाद जन्मास आला. महर्षीच्या आश्रमातील प्रल्हाद म्हणजे जणु सुगंधित सुवर्ण. नारदांनी त्याला नीरा-भीमा संगमी ‘ॐ नमो नारायणाय’ हा मंत्रोपदेश देऊन गुह्यज्ञान सांगितले. प्रल्हाद म्हणजे नवविधा भक्तीचा आद्य उद्गाता होय.

“श्रवणं कीर्तनं विष्णों: स्मरणं पादसेवनम् अर्चनं वंदनं दास्यं सरव्यमात्मनिवेदनम्” हे भक्ती सूत्र रचिले व स्वत: तृतीय भक्तीचा परमोत्कर्ष होऊन राहिला. आद्यभक्त नारदांपासून ते अर्वाचीन दासगणू महाराजांपर्यंत सर्वांनीच ज्याला मानाचे मुजरे केले त्या प्रल्हादाचे स्थान धृव झाले. असाहा प्रल्हाद नित्य निराभीमा संगमी जाऊन तेथे तप करी. त्याने तेथील वालुकेची नृसिंहमूर्ती करून तिची मनोभावे अर्चना केली. एकेदिनी तप फळास आले आणि “सोमश्रवण योगे तु प्रल्हादस्य हरि: स्वयम् दर्शयामास सत् रूपम्” श्री नृसिंहांनी प्रल्हादास “वरं बृही” म्हणताच तो बालभक्त म्हणाला. “स्वामीन्नतेन रूपेण विशास्यां प्रतिमां भूवि, ये भजन्ति समचीन्ती मानवा: प्रणमन्ति ये तेषामभीष्टकामानां पूरको भव सर्वदा”. श्री नृसिंहांनी प्रल्हादास अंकी घेतले. त्याचे वदन कुरवाळले, गदगद स्वरात श्रीनृसिंह संतोषाने वदले. “तथास्तु प्रतिमायां ते स्थास्याम्यन्न निरंतरम् पालयिष्यामि सुजनान् दर्शनादेव सदवरै:”