सतराव्या शतकाच्या प्रारंभी या प्राचीन तपोभूमीचे रुपांतर एका नगरात होऊ लागले होते. याच सुमारात संगमावरील मोठा घाट बांधून पुरा झाला. घाटाचे बांधकाम तीन वर्षे चालले. धाधजी मुधोजी यांनी कार्य करविले. इ.स. 1865 मध्ये श्री. विंचूरकर यांनी देवालयाचा जीर्णोद्धार पूर्ण केला. या संगम घाटावर वंशवृद्धीचे वरदान देणार्यास लज्जागौरीच्या मूर्तीची स्थापना केलेली आढळते. संगम घाटावर सोळाखांबी दगडी मंदिर निर्माण करण्यात आले, ते अद्यापही भग्नावस्थेत पहावयास मिळते. येथे पार बांधलेला एक अक्षय्य वटवृक्ष असून या पाराचा जीर्णोद्धार रघुनाथराव विंचुरकर यांनी केला. छत्रपती शिवाजीराजांनी देवस्थानास दिलेली सनद एवढी सुव्यवस्थित होती की तिची कार्यवाही पुढील सत्तांनी तशीच चालू ठेवली. इस्लाम धर्म स्वीकारलेल्या फलटणच्या बजाजी निंबाळ्कराचा शुद्धीकरण विधी याच क्षेत्री झाला. संभाजी राजांना ठार केल्यावर औरंगजेबाची छावणी अकलूज येथे पडली असताना, विध्वंसाच्या भीतीने नृसिंहमूर्ती दोन वेळा गुप्त ठिकाणी हलविण्यात आल्या होत्या. एका वेळी त्या नळदुर्ग या गावी देशमुखांकडे ठेवण्यात आल्या. देशमुखांचे कुलदैवत श्री नृसिंह होते. त्यांनी अगत्यपूर्वक कुलदैवताचे गुप्तपणे रक्षण केले. संकट दूर होताच मूर्ती पुन्हा नृसिंहपूरी स्थानापन्न झाल्या.

इंदूरच्या राणी अहिल्यादेवी होळकर या तीर्थाटनात नृसिंहपूर येथे आल्या होत्या. येथे त्या तीन दिवस राहिल्या. सहस्त्र ब्राम्हण भोजन झाले. पात्री रूपयाप्रमाणे दक्षिणा दिली गेली, असा उल्लेख आढळतो.

विठ्ठल शिवदेव यांनी नृसिंहपूर येथील संगामवर तपश्चर्या केली. शिवदेवांचे गुरु अमृतस्वामी यांच्या आशिर्वादाने इ.स. 1756 मध्ये जीर्णोद्धाराच्या कार्याचा शुभारंभ केला. दोन्ही नद्यांच्या पात्रात खोलवर पाया खणून तो प्रचंड शिळा आणि शिसे यांनी भरून काढला. हे कार्य सतत सात वर्षे चालु होते. या कामास त्यावेळी अडीच लक्ष रूपये खर्च आला. एकूण वीस वर्षे काम चालुन गर्भागार मंडप व शिखर पूर्ण हूओन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. एकूण बांधकाम वीस वर्षे चालले आणि सात लक्ष रूपये खर्च झाला. या प्रचंड कामाचा उल्लेख करणारा शिलालेख सिंहासनावर आहे. नवे मंदिर पश्चिमाभिमुख असून महाद्वार एखाद्या किल्ल्याच्या दरवाज्यासारखे आहे. विठ्ठल शिवदेव यांनी हे जीर्णोद्धाराचे कार्य पूर्ण केले. एवढेच नव्हे तर आपल्या एकूण जहागिरीपैकी सुरत जिल्ह्यातील चार गावांचे महसुलाचे उत्पन्न देवस्थानच्या व्यवस्थेसाठी लावून दिले. यातून पूजाअर्चा, नैवेद्य, नंदादीप, चौघडा इत्यादी व्यवस्था करण्यात आली. श्रीस बहुमोल अलंकारही त्यांनी अर्पण केले. यात सुमारे एक किलो वजनाच्या सोन्याच्या पगडीचा समावेश आहे. या अतुलनीय भक्तीने शिवदेवांचा उत्कर्षच होत गेला. दिल्लीच्या राजकारणाची सूत्रेही काही काळ त्यांच्या हाती सुरक्षित राहिली होती.

इ.स. 1795 मध्ये खर्डा येथे झालेल्या युद्धात पेशव्यांना मोठा विजय मिळाला. निजाम पराभूत होऊन शरण आला. या युद्धात सरदार विंचूरकर यांनी मोठा पराक्रम केला. युद्धानंतर खंडेराव विंचूरकर लगेच नृसिंहपूरास आले त्यावेळी मोठा दानधर्म व अन्नदान झाले. पुढे निजामी हद्दीत अरब, पठाण यांचे बंड झाले. ते बरेच पसरले. देवस्थास त्याचा उपद्रव होऊ नये याकरिता, काहीकाळ नृसिंहमूर्ती टेंभूर्णी येथे सदाशिवराव माणकेश्वर यांच्या वाड्यात ठेवण्यात आल्या. यावेळी ही वार्ता कळताच विंचूरकर सैन्यासह नृसिंहपूरास आले. हे कळताच बंडखोर लोकांनी पळ काढला. नंतर स्वत:च्या उपस्थितीत मूर्तीची स्थापना त्यांनी मंदिरात केली. यावेळी वैशाखी नवरात्र येथेच साजरे करून दानधर्म करून व अन्नदान करण्यात आले. काही काळ का होईना श्री माणकेश्वर यांच्या घरी नरहरींचे वास्तव्य झाल्याने त्यांचा उत्कर्ष होत गेला, आणि ते पेशव्यांचे कारभारी झाले. आपल्या कुलदैवताच्या क्षेत्री आपला निवास असावा यासाठी त्यांनी वाडा बांधला. भीमातीरावर माणकेश्वर घाटावर हा वाडा आहे. आजही या प्रचंड वाड्याचे अवशेष दिसतात.

प्रल्हाद मंदिराच्या मागील बाजूस एक प्रचंड घंटा आहे. ती मुळची वसई येथील चर्चमधील आहे. 1739 मध्ये चिमाजी अप्पांनी वसई जिंकून घेतल्यावर तेथून अशा चार ओतीव घंटा लूट म्हणून पुण्यास आणल्या होत्या. त्यांपैकी एक सदाशिव माणकेश्वर यांच्या प्रयत्नाने नरसिंहपूर येथे श्रीचरणी दाखल झाली. सफाईदार ओतकाम केलेल्या या घंटेचा नाद खणखणीत असून, पूजेचे वेळी ती वाजविली जात असे. तडा गेल्याने सध्या ती नादुरुस्त आहे. बाबा पहिलवान या एकट्या शक्तिशाली माणसाने ही प्रचंड घंटा बांधण्याचे काम केले, असे सांगितले जाते. या क्षेत्राच्या परिसरात वीरांची पाच शिलारूपी स्मारके आहेत. देवस्थानच्या रक्षणासाठी झालेल्या युद्धात या वीरांनी आपले प्राण अर्पण केले. या वीरांची नावे व ठिकाणे अज्ञातच राहिली आहेत. इतिहासात नोंद आहे की, अली आदिलशहा याने या गावाचा परिसर मंदिराला इनाम म्हणून दिला. हीच सनद शिवशाहीत कायम होती. पुढे पेशव्यांनी ती पुढे चालु ठेवली. पुधे इंग्रजी राज्य आल्यावरही अहमदनगर येथे इंग्रज अधिकार्यां नी ती कायम केली. देवस्थानच्या व्यवस्थेसाठी विठ्ठल शिवदेव यांनी दिलेले सहा हजार रुपयांचे ‘निरंतर अनुदान’ मुंबईचा पहिला गव्हर्नर एलफिस्टन याने मान्य करून त्यास मंजुरी दिली.

सरदार विंचूरकर शिवदेव हे विंचूरकर घराण्याचे मूळ पुरुष. श्रीनृसिंह त्यांचे कुलदैवत. विंचूरकर वंशजांनी पुढे देवालयाचे बांधकाम चालूच ठेवले. त्यांनी वेळोवेळी श्रीक्षेत्री येऊन निवास केला. दानधर्म, व्रते, अन्नदान इ केले. बहुमोल अलंकार श्रीस अर्पण केले. या घराण्यातील पाचवे वंशज रघुनाथराव यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. शिखराचे नुतनीकरण केले. त्यावर कलश चढवून सुवर्णध्वज लावला. नृसिंह मंदिराच्या ऐश्वर्याचा हा परमोत्कर्षाचा काळ होता. इ.स. 1865 च्या सुमारास नरसिंहपूर गावात रघुनाथरावांनी भक्कम पण सुंदर वाडा बांधला. जवळच्या मळ्यातून फुलांसाठी बागा तयार केल्या. रंगशास्त्री मायभटे यांच्या मार्गदर्शनाखाली वेदपाठशाळा, संस्कृत अध्ययन व अध्यापनाची सोय करण्यात आली. हे शास्त्रीबुवा काशीक्षेत्री शिकलेले विद्वान, अध्यापन-कुशल व कवीहृदयाचे होते. श्रीमुर्तीचा चौथरा रघुनाथरांवानी चांदीच्या पत्र्याने मढविला व त्यावर लेख कोरविला. त्यांची नृसिंहभक्ती आणि श्रद्धा अतुलनियच म्हणावी लागेल. पंचामृत पूजेनंतर प्रसाद घेताना शिर्स्त्राण नसणे योग्य नव्हे हे ध्यानी येताच त्यांनी स्वत:साठी चांदीचे शिरस्त्राण करविले. पण विनम्र वृत्तीमुळे त्यांनी या मुकुटावर श्री पादुका स्थापन केल्या. नंतर प्रसाद गहण केला. या मुकुटावर शंखचक्रादि शुभचिन्हेही कोरलेली आहेत.

श्री रघुनाथराव विंचूरकरांनी गरुडोत्सवाची नमी प्रथा रूढ केली. दक्षिण भारतातील कुशल कारागिरांकडून त्यांनी गरुडाची एक भव्य मुर्ती करविली. गरुड हे श्री विष्णुचे वाहन हि मुर्ती श्रीचरणी त्यांनी अर्पण केली. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी या गरुड मूर्तीच्या मस्तकी श्रींच्या पादुका ठेवून त्यांची मिरवणूक काढण्यात येते. ही गरुडमूर्ती अतिशय भव्य आहे. इ.स. 1881पासून हा उत्सव सुरु झाला. याचबरोबर रघुनाथरावांनी वाड्यापासून देवालयापर्यंत पक्का रस्ता तयार केला. रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणही केले. प्राथमिक शाळा सुरु करून तिच्या इमारतीचा खर्च केला.