श्री विठ्ठल शिवदेव यांच्या प्रयत्नाने या सुवर्णकाळाचा शुभारंभ झाला. त्यापुर्वी हे महान क्षेत्रभक्तांना माहिती असले, तरी उपेक्षित होते. रघुनाथराव विंचूरकर हे या भाग्यकाळाचे थोर शिल्पकार व साक्षी पुरुष होते. त्यांनी या क्षेत्राच्या वैभवात मोलाची भर घालून ते नामांकित आणि आकर्षक तीर्थ बनविले. दोन नद्यांनी तीन बाजुंनी वेढलेल्या या क्षेत्रास नद्यांच्या पाण्यामुळे वाहतुकीची अडचण ही नित्याची बाब होती. नावा चालवाव्या लागत. रघुनाथराव यांनी हे लक्षात घेऊन एक मोठी नाव बांधविली; आणि ती क्षेत्राच्या अधिकारी वर्गास अर्पण केली. यामुळे सर्वांचीच मोठी सोय झाली. त्यांनीच मूळच्या श्रीमूर्तीस वज्रलेप करवून सुदृढ मूर्ती महापूजेने स्थापन केली. रघुनाथराव यांच्या पत्नी जानकीबाई यांचे, येथील वाड्यातच निधन झाले. त्याही श्रेष्ठ नृसिंहभक्त होत्या. नीरा-भीमा संगमावर त्या विसावल्या. त्यांच्या प्रित्यर्थ जानकेश्वर हे शिवमंदिर रघुनाथरावांनी बांधविले.

श्री रघुनाथराव हे एक थोर पुण्यपुरुष होते. त्यांनी आपल्या संपत्तीचा परमार्थासाठी उपयोग करून नरसिंहपुराचेही हित पाहिले. धर्मनिष्ठा, औदार्य, विद्वत्ता आणि रसिकता या गुणांचा त्यांच्या ठायी उत्कर्ष साधला होता. ते सदाचारसंपन्न असून एक तत्पर साधक होते. नरसिंहाचे ते भाग्यविधाते झाले. जानकी-रघुनाथ या भक्त दांपत्याचे पुतळे, मंदिरातील कपाटात करयुग्म जोडून बसलेले दिसून येतात.

विख्यात नृसिंहभक्त देव मामलेदार हे जवळच्याच भोसेगावचे राहणारे होते. सरकारी सेवेतून मुक्त झाल्यावर असंख्य भक्तांना त्यांचे मार्गदर्शन लाभले. या थोर सत्पुरुषांचा व रघुनाथरावांचा परमस्नेह होता. नृसिंहभक्ती ही सत्प्रवृत्तीचे केवढे परं वैभव प्राप्त करू शकते याचे हे अगदी बोलके प्रतीकच आहे. अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्यासेवेतही श्री रघुनाथराव यांनी आपला काळ घालविला. स्वामी समर्थांनी भारतभर संचार केला. ते मोहोळ भागात आले असता या क्षेत्रीही येऊन गेले. नृसिंह हे त्यांचे उपास्य दैवत होते. या महापुरुषाचा सहवास रघुनाथरावांना लाभला, हे त्यांचे अहोभाग्य होय. 1857 च्या स्वातंत्र्य समरातील सेनानी तात्या टोपे मुळचे येवले येथील. श्रीनृसिंह त्यांचे कुलदैवत होते. कान्हेगाव येथील नृसिंहाचे ते व त्यांचे घराणे पूजाधिकारी होते. त्या धामधुमीच्या काळातही ते कधी प्रकटपणे तर कधी गुप्तपणे नरसिंहपूर येथे श्रींच्या दर्शानास आवर्जून येत असत. त्यांचे वंशज अद्यापही येत असतात.