काही क्षेत्रांना त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानामुळे देवभूमी मानले जाते. अत्युच्च हिमालयात वसलेली बद्री केदार, अमरनाथ, ही क्षेत्रे प्रसिद्धच आहेत. कालिदासाने म्हटल्याप्रमाणे 'पितु: प्रदेशास्तव देवभुमय:' | याचाच अर्थ हे पार्वती, तुझ्या पित्याचा हा प्रदेश (हिमालय) म्हणजे देवांचे निवासस्थानच आहे. सरस्वती व दृश्व्दती या दोन नद्यांमधील प्रदेश 'ब्रम्हावर्त' हा देवांनी निर्माण केलेला आहे, असे प्राचीन ग्रंथात म्हटले आहे. गंगा आणि यमुना यांच्या पवित्र संगमावरील 'प्रयाग' तीर्थ सुप्रसिद्धच आहे. यामुळेच या ठिकाणी यज्ञ केले जात असावेत.

नीरा - भीमा या नद्यांच्या संगमावर श्री क्षेत्र नृसिंहपूर वसले आहे, त्यास याच अर्थाने तुकाराम महाराजांनी 'दक्षिणप्रयाग' असे म्हटले असावे. नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. हे तीर्थ क्षेत्र या पुण्यकारक संगमामुळे पृथ्वीचे नाभीस्थान आहे असे पुराणात म्हटले आहे.

पुण्यापासून सुमारे एकशे पासष्ट किलोमीटर अंतरावर श्री नृसिंहाचे हे जागृत देवस्थान, नीरा-नरसिंहपूर या छोट्या गावी वसले आहे. श्री क्षेत्र नरसिंहपूर कडे येत असताना आजूबाजूचा प्रदेश रुक्ष दिसत असला आणि महापूर व भूकंप यामुळे पूर्व बाजू ओसाड झालेली असली तरी, मंदिराच्या प्राकारात प्रवेश करताच दृश्य आणि वृत्ती बदलू लागल्याचा अनुभव येतो. एखाद्या किल्ल्याच्या दरवाज्यातून प्रवेश करावा असे पश्चिमेकडील प्रचंड व्दार आहे. समोरच चिमाजी आप्पांचे स्मरण देणारी प्रचंड घंटा आहे. मंदिराचे गर्भागार आणि रंगशाळा मंडप विशाल, रेखीव आणि थकल्या भागल्यास विसावा आणि शांती देणारे आहेत. येथे बसून समोर दिसणारी, समयांच्या मंद प्रकाशात भावणारी श्री नृसिंहाची वालुका मूर्ती आहे. हे सर्व वातावरणात भारून टाकणारे आहे. भक्त प्रल्हादाची कथा प्रत्येक अबाल वृद्धाना परिचीत आहे.