निसर्गाने नीरा-भीमा संगमरूपी घडवून दिलेली चंदेरी सरी घालून उदार हस्ताने उधळलेल्या वनश्रीने श्री क्षेत्र नीरा नृसिंहपूर नटलेले आहे. एकेकाळी या चिमुकल्या नगरीचा आसमंत वृक्षांनी बहरलेला असे. विविध पक्ष्यांच्या कूजनांनी आणि अलिकुलाच्या गुंजारवानी गजबजलेला व भारलेला असे. आपला भव्यदिव्य हिरण्मय पिसारा फुलवून बेभान झालेल्या मोरांच्या केका, दूर उंचावर झाडांच्या गर्द छायेत बसून कुजन करणारे कोकिळ आणि भोवतालच्या निसर्गाशी रंगसंगती साधणारे पोपट व मैना यांनी नीरानृसिंहपूरचा रम्य परिसर मनास भुरळ न पाडील तरच नवल !

दुस-या महायुद्धाच्या काळात मोठमोठ्या वृक्षांची तोड त्या वेळच्या परकी शासनाने आणि सामान्य लोकांनीही केली. हि-याप्रमाणे चमचमणा-या पिसा-यांचे मोर अरसिक सोजिरांच्या आणि शिकायांच्या भक्ष्यस्थानी पडले. वृक्षांचा आसरा आणि निवाराच तुटल्याने पक्षी परागंदा झाले. मात्र आजही नृसिंह मंदिराच्या तटावरील आणि बुरुजांवरील कपायांत आपला संसार विपरीत परिस्थितीतही रेटणारी शोकदांपत्ये गतवैभवाची रम्य कथा सांगून आपला श्रमपरिहार करण्यसाठी आतुरतेने चिवचिवाट करत सायंकाळी रुंजी घालताना दिसतील.

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या आग्नेय टोकावर वसलेले हे तीर्थक्षेत्र इंदापूर या तालुक्याच्या शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी या गावच्या पश्चिमेकडील भुईकोट लिल्ल्याचा तट डावीकडे सोडून टेंभूर्णी अकलूज या उत्तर-दक्षिण मार्गावर संगम स्थानक दहा किलोमीटर अंतरावर आहे.

संगम स्थानकावरुन नदीकाठाने येताना नीरा नदीचे भव्य पात्र व त्याचे अलीकडील उंच कडे रौद्र स्वरुपाने आपले लक्ष वेधून घेतात. त्याचबरोबर पलीकडील तीरावरील किल्याप्रमाणे तटबंदी असलेले नृसिंह मंदिर, मंदिराचे उत्तुंग शिखर आणि मंदिरालगतचा नीरा नदीवरील विस्तीर्ण घाट यावर आपली नजर खिळून राहाते. एखाद्या चित्रकलावंतास रस्त्यावर थांबून या लोभस दृश्यास रंगबद्ध करण्याच्या मोह झाल्याशिवाय राहणार नाही.

बावडा मार्गाने आल्यास अतुंद वेशीतून आत प्रवेश करताच उजव्या हातास प्रसिद्ध विंचूरकर वाड्याची भिंत आहे. वाड्यासमोर येताच पूर्वेकडे शंभर-दिडशे पावलांवर नृसिंहमंदिराचा पुण्याच्या शनिवारवाड्याच्या दरवाज्याची याद आणून देणारा पश्चिम दरवाजा डोळ्यांत भरतो आणि मंदिराची ऐतिहासिक बांधणूक व वास्तू मनात ठसते. दरवाज्याच्या दोन्ही बाजुचे बुलंद बुरुज आणि त्या लगतचा नदीपात्रापासून नव्वद फूट उंचीचा चिरेबंदी तट अभेद्य किल्ल्यासारखा वाटतो. दरवाज्याच्या वरील दर्शनबाजूचा नगारखानाही शनवारवाड्याच्या धर्तीचा आहे.

नीरा-नृसिंहपूर हे पृथ्वीचे नाभिस्थान आहे हे एक भूवैज्ञानिक सत्य आहे. पद्मपुराणांतर्गत नृसिंहपूर महात्याचे त खालील श्र्लोक आढळतो.

सुदर्शनमित्या्भिहितं क्षेत्रं यद् वेदविव्द्रेः

तन्नाशभिरेषभूगर्भे क्षेत्रराजो विराजते ।

याचा अन्वय

यद् क्षेत्रं वेदविव्दारैः सुदर्शनं इति अभिहितं तत्

एषः क्षेत्रराज: भूगर्भे नाभिः विराजते ।

आणि याचा अर्थ असा, वेदज्ञजन ज्‍याचे वर्णन सुदर्शनीय क्षेत्र असे करतात ते हे (नीरा-नृसिंहपूर) क्षेत्रराज असून ते पृथ्वीच्या नाभिस्थानी विराजमान झालेले आहे. सुदर्शनीय म्हणजे नयनरम्य व दर्शन घेण्यास सुयोग्य असेही. नीरा-नृसिंहपूर हे पृथ्वीचे नाभिस्थान आहे हे एक भूवैज्ञानिक सत्य आहे.

नीरा-नृसिंहपूरपासुन सुमारे दहा मैलांवर, भीमेच्या काठावरच, भिवरवांगी नावाचे गांव आहे. त्या गावची पाहणी भारत सरकारच्या भूशास्त्रज्ञाच्या तुकडीने केली. त्या विशेषज्ञांनी, भिवरवांगी हा पृथ्वीचा केंद्रबिंदु आहे असा शास्त्रीय निष्कर्ष प्रकट केला. बिंदूत अस्तित्वञ मात्र असते. नाभीस अस्तित्व असून रुंदीही असते. भिवरवांगी व नरसिंहपूर ही ती रुंदी होय.