नीरा-भीमा संगमस्नानाचे महत्पुाण्या पुराणांतरी सांगितले आहे. संगमात स्नान केले की, सर्व तीर्थाच्या स्नानांचे पुण्य लाभते.

नीरा भीमरथी योगे स्नातस्यांगेषु बिंदवः

तावंत्यब्दसहस्त्राणि वसतिः स्मर्यते दिवि

इयं भीमा महादेवो नीरा साक्षाद्रमापतिः

उभयोः संगमो यत्र तत्रैवात्वंतिकी गतिः

सर्वेयं तीर्थरुपाभूः सर्वदेवमयो हरिः

सर्वांगमरसा भीमा नीरा सर्वफलौधिनी

अत्र तीर्था नि सर्वाणि मंत्रा अत्र प्रतिष्ठिताः

देवता नृहरिर्यत्र किमन्यद्वाशिष्यते ।


संगमाची नैसर्गिक रमणीयताही मनाला आगळाच आनंद देऊन जाते. सोळखांब्यावर अश्वस्थनारायणाकडे पाठ करुन हे दृश्य पाहावे. डाव्या बाजुने संथ वाहणारा भीमेचा धूसर व प्रगल्भ प्रवार व तिचे रुंद पात्र, उजव्या बाजूने खळखळाट करीत वाहणारे नीरेचे स्फाटिक निर्मल जल, भीमेच्या पात्रातील चकाकणारी पांढरी शुभ्र वाळु तर नीरेच्या पात्रातील काळेपणाने चमकणारी वाळू, नीरेच्या काठावरील उंच डोंगरकडा व त्या वरील टुमदार खेडे; त्याचे नावही संगमच. नीरेभीमेचा संगमप्रवाह वळणावळणाने दूरवर गेलेला, त्याच्या दोन्ही बाजूंस वृक्षराई, संगमनिकटी असलेली विनायक, जानकेश्वर अश्वत्थतनारायणाची छोटीमोठी मंदिरे, मंदिरामागचा अश्वत्थ व वटवृक्ष, त्यांच्या पानांची सळसळ, वटवृक्षावर स्वतःस उलटे टांगून घेतलेल्या वाघुळांचे थवे, प्रवाहाचा नाद व पानांचा आवाज याखेरीज नीरव शांतताअसे हे स्थाथन मनाची एकाग्रता घडवून आणते.

एरव्ही खळखळाट करीत वाहणारी नीरा भीमेला भेटताच आपला अवखळपणा सोडुन देते. पावसाळयात पूर आल्यानंतर एकमेकांवर आदळणार्‍या या दोन्ही जलप्रवाहांचे रौद्र स्वरुप हिवाळयात लडिवाळ बहिणींच्या प्रेमाची आठवण करुन देते तर उन्हाळयात या दोघींचे कृश सौदर्य पावसाळयातील कलहाचा पश्चाताप झाल्याचे दर्शविते. पावसाळयात कृष्णंपक्षातील रात्री मुसळधार पडत्या पावसात चमकलेल्या विदयुत प्रकाशात दिसणारे दोन्ही नदयांचे रौद्र सौंदर्य, हिवाळयात पहाटेच्या कडक थंडीत धूसर धुक्यातून दिसणारे अवगुंठित सौंदर्य तर उन्हाळयात पौर्णिमेच्या रात्री दिसणारे प्रशांत आणि मार्जित सौंदर्य ही व अशी सौंदर्यरुपे पाहण्यास रसिक मात्र हवा !