देवालयाच्या आतील बाजूस असणाऱ्या परिवार देवता खालील प्रमाणे.

शेजघर :
हे रंगशिळेच्या गाभाऱ्यात असून शेजघरात दोन पलंग आहेत. एक श्री नरसिंहाचा व दुसरा शामराजाचा. पलंगावर गाद्या, गिरद्या, उश्या व श्रींची प्रतिमा आहे.

स्तंभ-नरसिंह :
रंग शिळेच्या सभा मंडपातील एका स्तंभावर हिरण्यकश्यपूच्या वधाचा प्रसंग कोरलेला आहे.

श्रीलक्ष्मीमंदिर :
श्री नरसिंहाचे डावे बाजूस श्री महालक्ष्मीचे मंदिर आहे. श्री महालक्ष्मीची रेखीव व सुंदर मूर्ती गंडकी शिळेची आहे. मूर्ती उभी आहे. पूजा बांधल्यावर बसल्यासारखी दिसते. या मंदिराचे शिखर हे दगडी आहे. हे शिखर निरा नदीच्या पात्रापासून सुमारे १५० फुट उंच आहे. शिखराच्या दोन दगडामध्ये एक लहानशी फट आहे. त्यातून दिवस रात्र पाणी जीरपते. उगमस्थान अज्ञात असलेला हा लहानसा पाझर येथे गुप्त गंगा म्हणून ओळखला जातो. हा एक चमत्कारच आहे. तर्कशास्त्राने याचा उलगडा करता येत नाही.

भक्त प्रल्हाद मंदिर :
श्री नरसिंहाच्या समोर लाकडी सभामंडपात भक्त प्रल्हादाचे मंदिर आहे. हात जोडून उभी राहिलेली ही मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. प्रल्हादकृत नरसिंह मूर्ती व प्रल्हाद मूर्ती एकमेकांच्या समोर असून नरसिंह मूर्तीच्या पायांच्या समपातळीस या मूर्तीचे मस्तक येते हे एक विशेष आहे.

चिंतामणी :
श्री लक्ष्मीमंदिरा नजीक चिंतामणी देवता असून तेथे श्री गणपतीची मूर्ती व महादेवाची पिंडी आहे.

श्री दत्तात्रय मंदिर :
श्री दत्तासाठी एक छोटेसे देवालय बांधलेले आहे. हे बांधकाम संपूर्ण लाकडी असून दत्तमूर्ती पांढऱ्या संगमरवरी दगडाची आहे. हि मनोहर मूर्ती सिंहासनावर स्थापित आहे.

भीमा शंकर :
देवाच्या उजव्या बाजूस भीमा शंकराचे छोटेसे देऊळ आहे. शाळूकिंच्या मानाने पिंडी उंच आहे.

रुक्मिणी-विठ्ठल :
भीमा शंकराच्या उजव्या बाजूस छोट्या देवळात विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. दोन्ही मूर्ती पाहिल्यास पंढरपूरची आठवण येते.

राघवेंद्र स्वामी वृंदावन :
मद्व संप्रदायाचे श्रद्धास्थान मंत्रालय स्थित श्री राघवेंद्र स्वामी हे भक्त प्रल्हादाचा अवतार होत. वृंदावन प्रवेशानंतर त्यांचा प्रत्यक्ष वास मंत्रालय क्षेत्री आहे. “मंत्रालयासवे नीरा-नृसिंहपूरक्षेत्री मी विशिष्ट काळी निवास करेन” अशी त्यांची भविष्यवाणी असल्याने शके १८५० साली श्री राघवेंद्र स्वामींचे वृंदावन श्री नरसिंह देवालयात बांधले गेले. दरवर्षी श्रावण महिन्यात आराधना महोत्सव साजरा केला जातो.

शालीग्राम :
शाकंबरीच्या मंदिराजवळ शालीग्रामाच्या आकाराचा एक मोठा पाषाण आहे.

तरटी नरसिंह :
मोठा ओटा त्याच्या केंद्र स्थानी तरटी वृक्ष त्याच्या खाली श्रींच्या चार पादुका असून मंदिराशेजारच्या दुसऱ्या तरटी वृक्षास पार बांधलेला आहे.

शाकंबरी :
अठरा भूजांनी युक्त अशी देवीची मूर्ती या मंदिरात आहे.

काशी विश्वेश्वर :
खोल गाभारा असलेले शिकार युक्त व महादेवाच्या पिंडी प्रमाणे दिसणारे एक ओबडधोबड मध्यम देऊळ, समोर बसविलेला एक मोठा दगडी नंदी व गाभाऱ्यातील पिंडी शाळुंका हा काशी विश्वेश्वर येथे आहे. पिंड काढली असता खोलगट भाग दिसतो त्यात तीन लिंग आहेत ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश.

काळा दत्त :
काशी विश्वेश्वराच्या उजव्या बाजूस एका देवळात पाषाणाची दत्ताची मूर्ती आहे. त्यास काळा दत्त असे म्हणतात.

मुहूर्त गणपती :
एका स्तंभावरील कमानीत गजाननाची मूर्ती आहे. मुख्य देवालय बांधण्याअगोदर ही मूर्ती स्थापन केली.

काळभैरव :
पूर्व दरवाज्याकडे भैरव नाथाचे देऊळ ओवरीत आहे. या स्थानी सोनारी येथील भैरव नाथाच्या दोन मूर्ती आहेत.

रामेश्वर :
लक्ष्मी मंदिरा लगत एक रामेश्वराचे हे देऊळ आहे.


सोळखांबा मंदिर

धाधजी मुधोजी यांनी संगम घाट बांधला तसेच या घाटावर सोळा दगडी खांबांनी युक्त असे दगडी देव आहेत. या देवालयाच्या मध्यभागी अश्वस्थरुपी नरसिंह, गणपती, मारुती, शिवलिंग व वटवृक्ष या देवता आहेत. या पाराचा जीर्नोद्धार रघुनाथ विंचूरकर यांनी केला. देवालयाच्या पुढच्या बाजूस दीपमाळ व जानकेश्वर नावाचे शिवमंदिर आहे. सतीपत्नी जानकीबाई यांच्या स्मरणार्थ रघुनाथ विंचूरकर यांनी शके १८०३ साली हे शिवमंदिर बांधले.