काकड आरती :
पहाटे पाच वाजता सूर्योदयापूर्वी पूजाधिकारी देवालयाची द्वारे उघडून श्रीनृसिंहासह सर्व परिवार देवतांना काकड्याणने ओवाळतात. यावेळी श्रींस खिचडीचा नैवैद्य दाखविला जातो.

प्रातःपूजा :
सकाळी ७ वाजता पहिल्या प्रहरात हि पूजा पूर्ण होते. श्रीनृसिंह व श्रीशामराज या दोन्ही मूर्तीस पंचामृत स्नान घालून षोडशोपचार पूजा होते. नृसिंहपूर प्रथेनुसार ऋग्वेदीय व सामवेदीय सुक्तांनी तसेच पौराणिक मंत्रांनी पूजा केली जाते. नंतर श्री मूर्तीस पोशाख परिधान केला जातो. धूप दीपाने आरती होऊन श्रीस पायसाचा नैवैद्य दाखविला जातो. नंतर परिवार देवतांची पूजा केली जातो.

माध्यान्हपूजा :
दुपारी १२ वाजता श्रींस पुरणपोळीचा महानैवैद्य दाखविला जातो व महाआरती केली जाते.

सायंपूजा :
सायंकाळी ७ वाजता श्रींस पंचोपचारे मंत्रस्नान घालून धूप दीप नैवैद्य युक्त पूजा केली जाते. या वेळी नगारखाण्यातील नगारा नौबत, झांज, घाटी वाजवली जाते.

शेजारती :
रात्रौ ९ वाजता श्रींची शेजारती केली जाते. शेजारती नंतर चंपुप्रार्थना म्हणण्यात येऊन श्रींस दुधाचा नैवैद्य दाखविण्यात येतो. त्यावेळी श्रींपुढील चांदीचे दांडीपासून शेजघरापर्यंत पायघडी अंथरतात. या सर्व विधी नंतर श्री नृसिंहाची क्षमा मागून पूजाधिकारी द्वारे बंद करतात.