इतिहासकाळात श्री. ज्ञानदेव, एकनाथ, रामदास व तुकाराम या संत महाशयांनी आपल्या लेखनात नृसिंहकथेचा उल्लेख केलेला आहे. या काळातही नीरा नृसिंहपूर हे भाविकांचे यात्रेचे एक आवडते ठिकाण होते. आद्य शंकराचार्य मध्वाचार्य यांची नृसिंहस्तोत्रे प्रसिद्ध असून त्यांनीही या क्षेत्री संचार केलेला होता. संत नामदेव हे नृसिंहभक्त होते. ते त्यांचे कुलदैवत होते. तीर्थावळी या अभंगसंग्रहात त्यांच्या नीरानृसिंहपूर भेटीचा उल्लेख आहे. विजापूरच्या अदिलशहाने इंदापूरची जहागिरी शहाजी राजांना दिली होती, ती त्यांनी शिवाजीच्या नावे केली होती. दादिजी कोंडदेव या जहागिरीचा कारभार पाहात असत. सत्ता आदिलशहाची होती. एकदा आदिलशहाचा तळ भीमारीती नृसिंहपूराजवळ पडला असता संगमाच्या उंचवट्यावर भक्कम किल्ला भंधण्याची कल्पना त्यास सुचली. कामास सुरुवातही झाली. तेथील श्रेष्ठ तपस्वी उमाची पंडीत या प्रकाराने फार कष्टी झाले. त्यांसनी नृसिंहाला साकडे घातले. बादशहास पोटशूळ उठला. काही उपचार चालेनात. शेवटी वजिराच्या सल्ल्याने, या जाग्रुत देवस्थानाजवळील बांधकाम रहित केले. उमापंडिताने तीर्थप्रसाद दिल्यावर पोटशूळ थांबला. बादशहाने या प्रीत्यर्थ चौदा चाहुर जमीन उमापंडितास इनाम अग्रहार म्हणून दिली.

दुष्टांचा विनाश करणारे हे तेजस्वी दैवत समर्थ रामदासांना फार प्रिय होते. मनाचे श्लोकात नृसिंहाचा उल्लेख त्यांनी केला आहे. नृसिंहाची एक आरती त्यांनी रचिली आहे. समर्थ रामदास दोन वेळा नृसिंहपुरास आले असल्याचा उल्लेख आढळतो. एका भेटीत रामाच्या मूर्तीची स्थापना केली. दुसर्या भेटीत त्यांनी नृसिंहमंदिराच्या मंडपात कीर्तन केले.

आपल्या संतमेळ्यासह तुकोबांनी श्री नरहरीचे दर्शन घेतल्याचा उल्लेख त्यांच्या अभंगवाणीत आहे