संकटे कितीही आली तरी मानवी आकांक्षांना बांध नसतो. तशात नृसिंहभक्तांच्या अविरत प्रयत्नांना आणि अविचल श्रद्धेने जीर्णोद्धाराच्या प्रयत्नांना नेटाने सुरुवात झाली. “पुनश्च हरि ॐ।” मंदीराच्या सुदृढ व्यवस्थापनासाठी विश्वस्थ मंडळ निर्माण करण्यात आले. नृसिंह भक्तांची रीघ सुरु झाली. मदतीचा ओघ सुरु झाला. विश्वस्थ मंडळाच्या वतीने जीर्णोद्धाराचे कार्य हाती घेण्यात आले. इतस्तत: परागंदा झालेल्या लोकांचे, यथाशक्ती व यथावकाश पुनर्वसन करण्याचे कार्य नेटाने हाती घेण्यात आले. इ.स. 1947 मध्ये स्वातंत्र्य प्राप्ती झाल्यावर विकास कार्यास अधिक गती प्राप्त झाली. पाणीपुरवठा योजना, नद्यांवरील धरणे, विद्युत प्रकल्प आणि रस्तेबांधणी यामुळे एकंदर देशातच परिवर्तनाचे वारे वाहू लागले. त्याबरोबर नृसिंहपूरातही परीवर्तन झाले. भीमेवर उजनीसारखे प्रचंड धरण उभे राहिले. नीरेवर वीर धरण झाले. नृसिंहपूरास जोडणारा नीरेवरील पूल पुरा झाला. वाहतूक नियमित होऊ लागली. भक्तजनांची रीघ सुरु झाली.

इ.स. 1969 मध्ये “श्रीलक्ष्मीनृसिंह देवस्थान” ह्या न्यासाकडे देवालयाच्या संपूर्ण व्यवस्थापनाची धुरा सोपविण्यात आली. दिवंगत श्री. बापूसाहेब विंचूरकर आणि प्राचार्य न. गो. सुरु यांच्या नेतृत्वाखाली “विकास व उत्कर्ष मंडळ”ही संस्था स्थापन झाली. याद्वारे मंदिराचा परिसर नीट करण्याचे प्रयत्न सुरु झाले. मंदिरातील कार्यक्रम, नैमित्तिक विधी व उत्सव सुरु झाले. जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमास अग्रक्रम देण्यात आला. विद्यमान प्रमुख विश्वस्थ श्री. प्रमोद पु. दंडवते आणि त्यांचे सहकारी विश्वस्थ यांच्या अथक प्रयत्नांमुळे, व्यवस्थापनात सुधारणा होऊन उत्पन्नात वाढ झाली. मंदिराच्या प्राकारात पाण्याची टाकी, स्वच्छतागृहे, भक्तांना निवासासाठी खोल्या, मंदिराचे वेगळे कार्यालय इ. सोयी करण्यात आल्या. नृसिंहजयतीचा वार्षिक समारोह थाटात व भाविकांच्या भरगच्च उपस्थित संपन्न होऊ लागला. भक्तांच्या भावनांना प्रतिसाद म्हणून “शाश्वतपूजा योजना” सुरु करण्यात आली. शिक्षण मंडळामार्फत गावात माध्यमिक विद्यालय सुरु झाले. जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमात सरकारचे देखील सहाय्य उपलब्ध झाले. मंदीराचा परिसर स्वच्छ व आकर्षक करण्याची रूपरेषा तयार झाली आहे. पूर्वेकडील, पडझड झालेल्या इमारतींच्या काही मालकांनी आपापल्या जागांचे हक्क मंदिराच्या विश्वस्थ मंडळामंडळाकडे सुपूर्त केले आहेत. पूर्व दरवाज्यापासून ते संगमघाटापर्यंत सुंदर उपवन करण्याचा विचार आहे.मंदिरास पूर्ववैभव प्राप्त करून देण्यास श्रीलक्ष्मिनृसिंह देवस्थान विश्वस्थ मंडळ कटीबद्ध आहे.