सांप्रतचे श्रींचे देवालय

सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे. देवालयाच्या चारही बाजूनी रुंद व भक्कम असा दगडी तट आहे. श्रीमुर्तीचा प्रमुख गाभारा, त्यालपुढील गर्भागार, रंगशिलेचा सभामंडप हे संपूर्ण दगडी बांधणीचे काम असुन ते खसखशी टाकीचे आहे. दगडी छतावरील वेलपत्ती, नक्षी व विविध देवांच्या मूर्ती लक्षणीय आहेत. घडीव दगडी खांब कुशलतापुर्वक कोरलेले आहेत. वरील तीन यंत्राकार गाभारे व शिखर एकसमयावच्छेदेकरुन पाहिल्यास ते महादेवाच्या शाळुंका-पिंडीप्रमाणे दिसते. पितळी दरवाज्यापुढे लाकडी सभामंडप असून त्यापुढे प्रल्हादाचे मंदिर आहे. रंगशिलेच्या मंडपाच्या दोन्ही बाजूस दोन उन्मुखे आहेत. सर्व दगडी दरवाज्यांवर जयविजय घडविलेले असून पितळी दरवाज्यावरील जयविजयांची सुबकता व मुद्रा या विलोभनीय आहेत.

वास्तुयशिल्पशास्त्रानुसारे पूर्वद्वावरील व्दारपाल मुर्तींना जय-विजय, पश्चिम व्दारपालांना नंद-सुनंद, दक्षिण व्दारपालांना बल-प्रबल व उत्तर व्दारपालांना कुमुद-कुमुदाक्ष अशी नामाभिधाने आहेत. दोन्ही उन्मुखाचे खांब व त्या बाजूचे दगडी हत्ती हे केवळ प्रेक्षणीय. असे दगडी हत्ती, पश्चिम दरवाजा, पूर्व दरवाजा व दक्षिण उत्तर उन्मुखे येथे आहेत. विंचूरकरांच्या तसबिरी सभामंडपात लावलेल्या असुन त्या शंभर वर्षापेक्षा अधिक जुन्या आहेत. स्थानिक शामराज वांकर यांनी वेचलेल्या पुराणांतरीच्या नीतिबोधाचे सहा फलकही मंडपात लावलेले आहेत. देवालयाच्या शिखरावर तसेच सौधावर पुराणातील कित्येक प्रसंगाचे, कांही शृगांरिक-पेशवाई वेषातील कोणी एक तरणाबांड सरदार व त्याच्या शेजारी चापुन चोपून वस्त्र नेसलेली त्याची ती, हा सरदार तिचे उरोज दर्शवितो आहे अशा प्रसंगांचे तसेच साहेब मंडमांचेही पुतळे आहेत. भीममारुती, बाबा पहिलवान व अष्टभुजा जंगदंबा हे पुतळे विशेष प्रेक्षणीय आहेत. देवालयाचा पश्चिम दरवाजा फारच भव्य व प्रेक्षणीय आहे. जमिनीपासुन तेहतीस पायर्याय उंच. यापैकी एका पायरीचा दगड घडविताना त्यावर देवाचे पाऊल उमटलेले आढळले. ती खूण तशीच राखून हा दगड पायरीस बसविला पायर्यांबच्या दोन्ही बाजूंस दोन उत्तुंग बुरुजीलगत ऐश्वर्याचे प्रतीक असे दोन हत्ती, असे हे भव्य बांधकाम आहे. या भल्या प्रशस्त दरवाज्यावरील माडी व त्यावरील सज्जा. पुण्याच्या शणीवारवाडयाची प्रतिमा समोर ठेवुन हे बांधकाम झालेले असावे.

पश्चिम दरवाज्यातुन दिसणारे दृश्य तर केवळ विलोभनीय. समोर दिसणारा नृसिंहतीर्थाचा रम्य आसमंत व नृसिंहतीर्थाशी असणारी या दरवाज्याची समांतर पातळी, वळणावळणाने वाहात येणारी नीरा नदी, डावे बाजूस लक्ष्मी घाट, शीतल वार्यातचा सुखद स्पर्श व पाठीशी श्रीनृसिंह व भक्त प्रल्हादाची परंपरा. हे दृश्य व वातावरण देहभान हरपवून टाकते.

देवालयाच्या चारही बाजुंनी ओवर्‍या असून उत्तर दरवाजा (धमाधमा), पुर्वदरवाजा (महाव्दार) व अपुरा राहिलेला दक्षिण दरवाजा असे एकुण चार दरवाजे आहेत.


देवालयातील शिल्प सौदर्य

देवालयाची देखणी उंची, तीवरुन दिसणारा नीरा-भीमा यांचा प्रवाह व उभयतांचा संगम, देवालयाच्या विविध अंगोपांगाची परस्परांशी असलेली प्रमाणबध्दता, उत्तुंगता आणि भव्यता यांचा सुरेख संगम साधणारे शिखर, पश्चिम दरवाजा व त्या‍चे दोन्ही बुरुज, आगळेपणाने शोभणारे महाद्वार (पूर्व दरवाजा) विविध स्थानी आढळणार्या् कमानी आणि महिरपी, चारी दरवाजांसमीपचे सुक्ष्म दृष्टीचे हत्तीचे पुतळे, विविध स्थानी आढळणारे विविध प्राण्यांचे पुतळे, पशुपक्षी, वृक्षवेली यांची शिल्पे, वेगवेगळया प्रकारच्या नक्षी, कंगोरे, प्रमाणबध्द व घाटदार खांब, अतीव देखणा व सुबक असा पितळी दरवाजा, वेगवेगळया स्वरुपांतील जयविजयांच्या जोडया, प्रशस्त् अशी दक्षिण व उत्तर उन्मुखे, कित्येक कीर्तिमुखे, दगडी दरवाज्यावरील जाळया, तोरणे, शृंखला, वेलपत्री, शेजघराच्या दारचौकटीचे उत्कृष्ट कलाकौशल्य, विविध कोन, रमणीय छतशिल्प, देखणे स्तंभशिल्प, दक्षिणेकडील ओव-यांतील विलक्षण प्रमाणबद्धता, देवालयाच्या प्राकारात असलेल्या लहानमोठया देवळांची वेगवेगळया पध्द्तीची शिखरे व आकार, प्रशस्त सौंध व परिक्रमामार्ग, दीपमाळेतून होणारा दीपाचा साक्षात्कार, पश्चिम दरवाज्यावरील नगारखान्याची भव्यीता, त्यावरील माडी, तेथील लाकडी कामाची सुबकता अशांचा साकल्याने विचार केला तर देवालयाचे शिल्पसौंदर्य हा एक स्वतंत्र चिंतनाचा विषय ठरतो.


देवालयाच्या शिल्पसौंदर्यातील विविधता

केवळ दगडी दरवाज्यांची शिल्पे निरखून पाहिली तर श्रीमूर्तीच्या गाभा-याचा दरवाजा, रंगशीळेच्या गाभा-याचा दरवाजा, पुर्व दरवाजा, दक्षिण व उत्तर उन्मुखाचे दरवाजे पितळी दरवाजा, पश्चिम दरवाज्यांची उत्तुंगता व प्रमाणबद्धता यांच्या शिल्पातील वैविध्य मनमोहक आहे. लाकुडकामाचा विचार केला तर प्रल्हादाच्या सभामंडपातील लाकडावरील नक्षीकाम, वेलपत्ती, कठडे, तोरणे, पानपट्टी आणि प्राण्यांच्या आकृत्या, शेजघराच्या दार चौकटीवरील मनोहर असे नक्षीकाम, नगरखान्यावरील लाकडी शिल्पे, प्रल्हाद सभामंडपाच्या माडीवरील लाकडी कामाचे विविध मनोहारी नमुने, त्या काळातील या कलेच्या आदर्शाचा ठसा मनावर उमटवून जातात. केवळ कमानींचाच विचार केला तर प्रल्हादाच्या सभामंडपाच्या माडीवरील लाकडी कमानी, लक्ष्मी आणि प्रल्हाद मंदिराच्या दगडी कमानी, तरटी नृसिंह मंदिराच्या विटांच्या कमानी, पश्चिम दरवाज्यावरील दिव्य आणि भव्य कमान, प्रमुख शिखरावर आकारलेल्या किती एक विविध प्रकारच्या छोटया मोठया कमानी, चिंतामणी मंदिराची कमान, पश्चिम दरवाज्याकवरील नगारखान्यातील कमान, तसेच नगारखान्याच्या माडीवरील तीन सुबक कमानी अशा या कमानी शोभादर्शक यंत्राप्रमाणे विविध आकृतिबंध दर्शवून जातात. शिखरांकडे नजर टाकली तर मुख्य शिखराची उत्तुंगता, व्याप आणि प्रमाणबद्धता, त्यावर आकारित केलेल्या देवता, भक्त, संत, पशु-पक्षी, प्राणी, विविध प्रकारचे कळस आणि कंगोरे, शिखराच्या सर्वोच्च टप्प्यावरील सुवर्ण कळस आणि ध्वज व श्रीविष्णुचे आयुध गदा, काशीविश्वेश्वराच्या मंदिराच्या शिखराची गुढ रचना, तसेच देवालयातील छोट्याछोट्या मंदिरांवरील शिखरांची विविधता यातून तत्कालीन वास्तुरचनाशास्त्राचा आवाका दृग्गोचर होतो. पितळी दरवाज्यावरील दक्षिण आणि उत्तर उन्मुखावरील शेजघरानजीकच्या दगडी चौकटीवरील पूर्व दरवाज्यावरील या प्रत्येक दरवज्यावरील जय-विजयांची शिल्पे तत्कालीन वास्तुशास्त्रज्ञांच्या अंगभूत कलेचा अलंकृत आविष्कार आहे. या जय-विजयांचे विविध आकार, त्यांच्या मुद्रावरील भाव, त्यांची आयुधे व सहदेवता यांच्यातील बारकावे, प्रमाणबद्धता, त्यांची आसने अवघेचि मनास आल्हाद देणारे आहे. रंगशिळेच्या सभामंडपातील पश्चिम दरवाज्या नजीकच्या प्राकारातील, पूर्व सभामंडपातील, लक्ष्मी मंदिराच्या कमानी समीपची स्तं‍भशिल्पे तसेच छतशिल्पे, कित्येक नागशिल्पे, पूर्वपश्चिम महाद्वारातील तसेच दक्षिण उत्तर उन्मुखातील दगडी हत्तींच्या आकारातील विविधता व एकवाक्यता, पश्चिम दरवाज्याच्या आकारास साथ देणारी प्रशस्त आश्रयस्थाने, काशीविश्वेश्वरासमोरील ऐटदार नंदी, पितळी दरवाज्यासमीप स्थापिलेल्या मराठी व संस्कृत शिलालेखांच्या अक्षरांचा रेखीवपणा, घाटदारपणा व अचूकपणा, दक्षिणकेडील दुधईच्या ओव-यातील प्रमाणबद्धता व त्यांचा एक जिनसीपणा, किती, एक किर्तीमुखे दगडी उंब-याचे विविध आकार आणि प्रकार, अर्धबदामाकार स्वागतकमानी, रंगशिळा असे हे अवघे शिल्पसौंदर्य आपल्या वाडवडिलांच्या पुण्याईचा ठेवा आहे. शरद ऋतूतील पौर्णिमेच्या रात्री शारदीय चांदण्यात साकल्याने दिसणारे हे देवालय पाहून असे वाटून जाते की मानस सरोवरातील वस्तीस कंटाळलेला एखादा राजहंस या देवालयाचे रुप घेऊन नीराभीमा संगमावर विसावला आहे.


देवालयाच्या रचनेतील अद्भुत वास्तवता

शिवपूर्वकाळात बांधला गेलेला संगमघाट व सोळखांबा तसेच पेशवे काळात बांधविले गेलेले श्रीनृसिंहाचे देवालय यांच्या रचनांतील दिव्य कल्पकता, त्यासाठी पिढयानपिढया घेतले गेलेले अथक परिश्रम, अपराजित जिदद्, निसार्गाशी घेतलेली झोंबी, सातत्याने होत असलेला भारी खर्च, या सर्वाचा विचार केला तर “अद्भूत” हाच एकमेव शब्द डोळयासमोर येतो. त्या त्या काळातील रौद्रस्वरुपी निसर्गाशी बेदरकारपणे झुंज घेतघेतच ही बांधकामे पूर्णत्वास गेलेली दिसून येतात. विशेषतः इतिहासकाळात अप्रतिहतपणे वर्षत राहणारा पाऊस, नीराभीमांना अखंड येणारे महापूर, नद्यांची सातत्याने पाण्याने भरणारी व ओसंडणारी पात्रे, यांचा विचार केल्यास घाट व देवालयाची पायाखणणी व भरणी ही अनाकलनीय कामे कशी पार पडली गेली असतील याची कल्पना करवत नाही. नदीच्या पात्रात पाया खणताना पाणी उपसण्याचे कोणते तंत्र वापरले असेल याचा विचार करता अचंबा वाटतो. यंत्रे तर त्या काळात नव्हती. असे असतानाही तात्का‍लीन विशिष्ट अशी कोणती तंत्रज्ञाने वापरली असतील याचा विचार करताना बुध्दी चकित होते. दोन नदयांच्या संगमापासूनचे अवघे नीरेवरील व भीमेवरील घाट व देवालय यांची पायाभरणी हा तत्कालीन प्रगत अशा वास्तु रचानाशास्त्राचा काळावर मिळवलेला विजयच आहे हे मान्य करावयास प्रत्यवाय राहात नाही.