श्रीक्षेत्र नीरा नृसिंहपूर या प्राचीन देवस्थानाचा इतिहास उल्लेखनीय आहे. ‘पद्म’ पुराणातील बाराव्या ध्यायातून या क्षेत्राचे सविस्तर वर्णन आणि महत्व विशद केलेले आहे.

पुराणग्रंथांच्या कितीतरी शतके आधी असणा-या वेद, उपनिषदे या ग्रंथांमधून कधी स्पष्ट तर कधी रुपकांच्या सहाय्याने हे अवतार निर्देशित केलेले आढळतात. ऋग्वेदातील विष्णुसुक्तात बटुवेशधारी वामनरुप विष्णूंनी तीन पावलांत अवघे विश्व व्यापल्याचा उल्लेख आहेच. भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात, ‘दैत्यांमध्ये मी प्रल्हाद आहे.’ असे म्हटले आहे. गीतकार व्यासांना ही नृसिंहावताराची कथा चांगलीच अवगत असणार, हे उघड आहे. भागवत पुराणाचा विख्यात टीकाकार श्रीधर याच्यावर श्रीनृसिंहाची पुर्ण कृपा होती व यामुळेच त्याला हे सखोल ज्ञान झाले होते, असा उल्लेख आहे. श्री. विष्णूंच्या अवतारकथांत नृसिंहवताराचे महत्वपुर्ण स्थान आहे. ईश्वर अणूरेणू व्यापून राहिला आहे हे शास्त्रीय सत्य नाकारणा-या हिरण्यकश्यपूला, त्याच ईश्वराने नृसिंहरुपाने ठार केले.

पद्म्पुरणात म्हटले आहे की, हिरण्यकश्यपू याची पत्नी कयाधू हीचे इंद्राने हरण केले. त्याला तिचा वध करायचा होता. कयाधू ही यावेळी गर्भवती होती. नृसिंहपूर क्षेत्राजवळ नीरेकाठी नारदांचा आश्रम होता. नारदांनी इंद्रास थांबवून, कयाधूच्या पोटी भगवदभक्त जन्मास येणार आहे, असे सांगितले. नारदांचे वचन प्रमाण मानून इंद्राने कयाधूस नारदांच्या आश्रमात ठेवले. पुढे कयाधू प्रसूत होऊन तिच्या पोटी प्रल्हादाचा जन्म झाला. नारदांच्या सहवासात त्याची भक्ती दृढ झाली. नीरा-भीमा संगमावरील वाळूची नृसिंहमूर्ती करून तो तिची नित्य पूजा करी. या मूर्तिरूपात श्रीनृसिंहानी त्याला वर दिला की, तुझ्याप्रमाणे जे, या वालुकामुर्तीची पूजाअर्चा करतील, त्यांच्या मनोकामनाही पूर्ण होतील. हिरण्यकश्यपू हा मूलस्थान (मूलस्तान) येथे राज्य करीत होता. त्याला आपल्या मुलाची ही ईश्वरभक्ती (शत्रुअप्रशंसा) न आवडल्याने प्रल्हादाचा फार छळ केला. यामुळेच पुढे नृसिंहाच्या हातून त्यास मरण आले.

ऋग्वेदात “व्दे विरूपे चरत: ।” या शब्दांनी आरंभ असलेले सूक्त हे श्री नृसिंहास उद्देशुन आहे. असे त्यावर भाष्य करतांना श्री. कृष्णाचार्य दंडवते यांनी सविस्तर दर्शविले आहे. दोन नद्यांचा संगमाचा त्यात निर्देश असावा, आणि ते स्थान नीरा-भिमा संगम हेच असावे, असा या भाष्याचा मतितार्थ आहे. नंतरच्या तैत्तरीय आरण्यक व महानारायणीय उपनिषदात, नृसिंहास उद्देशुन केलेल्या प्रार्थना आहेत. यावरून इ. सनापुर्वी किमान दोन हजार वर्षापासून नृसिंहाची उपासना रूढ असावी असे म्हणता येते. सुप्रसिद्ध भागवत पुराणाच्या सातव्या स्कंधात अध्याय 1 ते 10 यात नृसिंहआख्यान अत्यंत रसाळ शैलीत वर्णन केलेले आहे.