चाकाचे आरे फिरत असता जसे खालीवर होत असतात, त्याप्रमाणे या जगात नगरे, माणसे, राज्ये यांचे भाग्य सुद्धा वाढत वा विलयास जात असते. याला नरसिंहपूर तरी कसा अपवाद असणार? नियतीला या समृद्ध क्षेत्राचे भाग्य पाहावले नाही. दोनवेळा दुष्काळ पडून प्रजा हैराण झाली, वरुणराजाची अवकृपा म्हणजे अवर्षण किंवा अतिवृष्टी ही संकटे होत. तीन्ही आसमानी संकटेच. त्यांच्यापुढे कोणाचे काय चालणार? पुढे दोनवेळा अतिवृष्टी होऊन महापुराने नरसिंहपूर जलमय झाले. घरे, शेती, जनावरे यांची वाताहत आली. त्यात भर म्हणून प्लेगची साथ पसरली. तिचा मोठाच आघात झाला. लोक गाव सोडून इतरत्र पांगले. कसबी, कारागीर इ. गाव सोडून गेल्याने आणि घरे उद्ध्वस्त झाल्याने या नगरीला ओसाड गावाची अवकळा प्राप्त झाली. बरीच ब्राम्हण मंडळी पोटापाण्याच्या उद्योगासाठी शहरात दाखल झाली. मंदिराच्या प्राकाराचे महापुराने मोठेच नुकसान झाले. दक्षिण बाजूचा तट खचून त्यास भेगा पडल्या. तट कोसळण्याच्या बेतात आला. पूर्व बाजूंचे वाडे जमीनदोस्त झाले. इ.स. 1948 मधील म. गांधींच्या हत्यनंतर उसळलेल्या जाळपोळीत गावातील ब्रम्हवृंदांची घरे भस्मसात झाल्याने उरले सुरले ब्राम्हण देशोधडीस लागले. क्षेत्रोपाध्यांची पाच-सहा घरे तग धरून कशीबशी राहिली. या वावटळीत मंदिराला धक्का लागला नाही. इ.स. 1956 मध्ये पुन्हा महापुराचे थैमान झाले. इ.स. 1968 मध्ये व अगदी अलीकडे झालेल्या भूकंपाने मंदिराच्या शिखराला व तटाला मोठ्या भेगा पडल्या. प्राकारात बरीच पडापड झाली. यात भर म्हणून चोर व लुटारूंच्या टोळ्यांनी लोकांना हैराण केले. या सर्व आपत्तींनी या भाग्यवान क्षेत्राचे रूप पार पालटून गेले. या वाताहतीतून सर्व पुनर्वसन व मंदिराचा जीर्णोद्धार कसा करायचा ही मोठी समस्या निर्माण झाली.